पुणे : ऐकता दाट या पुस्तकातून आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांच्या मुलाखती आहेत. त्यांच्या काळातील समाजव्यवस्था, राजकीय परिस्थिती, नागरिकांच्या समस्या यांचे वर्णन केले आहे. त्यातून आजच्या काळाशी निगडित रखरखीत वास्तव पाहायला मिळेल, असे मत लेखक आसाराम लोमटे यांनी व्यक्त केले.
साधना प्रकाशन आयोजित आणि अतुल देऊळगावकर लिखित ऐकता दाट या ऑनलाइन पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.
लोमटे म्हणाले, कोरोनाने ग्रासलेल्या काळात सर्वांच्या आपापसांत संवाद थांबला होता. कोरोनाची दहशत निर्माण झाली होती. अजूनही ती गेलेली नाही. अशा परिस्थितीत देऊळगावकर यांनी या आठ दिग्गजांशी संवाद साधून मुलाखती घेतल्या. त्यामुळे त्या काळातील जिवंत आस्था ग्रंथरूप पुस्तकातून दिसून येते. तुकाराम शृंगारे, मधु लिमये, डॉ. श्रीराम लागू, वीणा गवाणकर, विजयअण्णा बोराडे, नंदा खरे, डॉ. शुभांगी आणि डॉ. शशिकांत या व्यक्तींनी व्यक्तीचा विकास, आर्थिक विषमता, शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील प्रश्न, आरोग्याची पायवाट, त्याविषयी कामाचा परिचय पुस्तकातून दाखवला आहे. हे सर्वच विषय सद्याच्या काळाला लागू होणारे आहेत. त्या विषयांचा आशय मोठा असल्याने त्यातील मूल्यभावना फारच महत्वाच्या दिसून येतात. सर्व माणसांच्या जडणघडणीचा प्रवास, जग बदलण्याचा भाव, समाजातील प्रत्येक गोष्टींची महत्वपूर्ण विस्तृत माहिती मुलाखतीतून दिसते.
---
शब्द ऐकून काही होत नाही. त्यामागची भावना समजून घ्यायला हवी. तरच आपण सुसंस्कृत होऊ शकतो. आपण काही वाचल्यावर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो. याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. तुकाराम शृंगारे यांचे सामाजिक, राजकीय कार्य, मधू लिमये यांचे तत्वग्रागी साधेपणा, श्रीराम लागू यांचे तत्वज्ञानी विचार, बोराडे यांचे शेतकरी प्रश्न, नंदा खरे यांचे आर्थिक विषमता आणि गरिबी बाबतचे विचार त्यावरील तोडगा, शुभांगी यांची आरोग्याची वाटचाल, अशा सर्व क्षेत्राचे विस्तृतीकरण मुलाखतीद्वारे पुस्तकातून दिसून येणार आहे.
- अतुल देऊळगावकर
--
अतुल देऊळगावकर यांची मुलाखत घेण्याची नेहमी तयारी असते. त्यांच्या मुलाखतीत मानवी मूल्यांचा शोध असतो. देऊळगावकर यांची अभ्यासुवृत्ती या मुलाखतीतून दिसून येते.
- वीणा गवाणकर