पिंपरी : रस्त्यावर वर्दळ असताना त्यात बेशिस्त वाहनचालक रस्त्यातच बेशिस्तरीत्या मोटारी उभ्या करीत असल्यामुळे जमतानी चौकात दररोज सकाळच्या सुमारास वाहतूककोंडी उद्भवत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या असल्याने या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. येथील चौकात शाळा-महाविद्यालय असल्याने सकाळपासून विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते. या चौकाच्या अलीकडेच डिलक्स चौक असून, या चौकापर्यंत ही वर्दळ सुुरू असते. या चौकातील कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यरत असतात. मात्र, असे असतानादेखील परिसरातील व्यावसायिक त्यांच्या मोटारी रस्त्यातच उभ्या करतात. तसेच सकाळपासून खाद्यपदार्थ व फळविक्रेत्यांच्या हातगाड्याही रस्त्यावरच उभ्या राहत असल्यामुळे या चौकात दररोज वाहतूककोंडी होत आहे. वैभवनगर, संजय गांधीनगर व मिलिंदनगरकडे जाणारा रस्ताही या चौकातूनच जात असल्याने या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ते प्रशस्त केले आहेत. मात्र, मोटारचालकांनी आणि विक्रेत्यांनी रस्ते गिळकृंत केल्यामुळे पीएमपीएल बसला वाट काढणे अवघड झाले. पिंपरीगावात जाणाऱ्या बसला दररोज या चौकातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. मिलिंदनगरकडून येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने या चौकात कोंडी होत आहे. स्कूल बसलादेखील शाळेकडे जाण्यासाठी रस्ता राहत नाही. (प्रतिनिधी)
पिंपरीत वाहतूककोंडी नित्याची
By admin | Published: August 29, 2016 3:10 AM