आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका आज (दि.१९) सकाळी नऊच्या सुमारास आजोळघरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतील. या पार्श्वभूमीवर शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवनेरी बसेस रविवारी दुपारी आळंदी नगरीत दाखल झाल्या आहेत.
मंदिर देवस्थान व आळंदी नगरपालिकेच्या वतीने उपलब्ध दोन्ही वाहनांना सॅनिटाईज करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बसला आकर्षक फुलांमधून सजावट करून प्रस्थान प्रवासासाठी सज्ज आले आहे.
तत्पूर्वी, सोमवारी (दि.१९) पहाटे घंटानाद झाल्यानंतर आजोळघरात माऊलींच्या पादुकांना पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे-पाटील, प्रमुख विश्वस्त अभय टिळक अन्य मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा होईल. तर प्रमुख ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात येईल. सकाळी सातच्या सुमारास आजोळघरात माऊलींच्या चलपादुकांसमोर दैनंदिन कीर्तन सेवा पार पडेल.
फुलांनी सजविलेल्या दोन्ही विशेष बस पोलीस बंदोबस्तात आजोळ घराबाहेर आणण्यात येतील. तोपर्यंत निमंत्रित वारकऱ्यांना सॅनिटाईज करून मंदिरात प्रवेश दिला जाईल. सकाळी नऊच्या सुमारास मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ - मृदुंगाच्या गजरात "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" असा जयघोष करून माऊलींच्या पादुका बसमध्ये फुलांनी सजविलेल्या खुर्चीवर विराजमान करण्यात येतील. पादुकांसमवेत प्रत्येकी एका बसमध्ये वीस याप्रमाणे चाळीस वारकऱ्यांना प्रवेश दिला जाईल. वारीतील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दोन्ही बसचे विधिवत पूजन करून हा आषाढी बसवारी सोहळा पोलीस बंदोबस्तात आजोळघरापासून नगरपालिका चौकातून इंद्रायणीच्या नवीन पूलमार्गे पंढरीला प्रस्थान ठेवेल. तर वाखरीत हा सोहळा पायीवारीसाठी विसावेल. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा संपन्न होईल. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी होईल.
१८ आळंदी १
आळंदीतून शाही थाटात पंढरीला विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या माऊलींच्या चांदीच्या चलपादुका.
१८ आळंदी
पालखी प्रवासासाठी आळंदीत दाखल झालेल्या दोन्ही विशेष शिवनेरी बस.