पुणे (विमाननगर ) : पुणे - अहमदनगर रोड वरील हॉटेल 'हयात रिजन्सी' याठिकाणी 30 जून रोजी एक शाही विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याबाबतची आवश्यक परवानगी आयोजकांनी येरवडा पोलीस स्टेशनकडून घेतली होती. मात्र ,या विवाह सोहळ्याला दोनशेहून अधिक नागरिक उपस्थित राहिले आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे या लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्यांपैकी २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू आणि २५ हुन अधिक जणांना संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनासह लग्न सोहळा आयोजकांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली आहे.
पोलिसांनी लग्नाला परवानगी दिल्यानंतर नियमांचे उल्लंघन करत सोहळ्यात दोनशेहुन अधिक जास्त लोक उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले. लग्न सोहळा नंतर त्यातून लग्न सोहळ्यातील उपस्थित अनेकांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला. दुर्दैवाने उपस्थितांपैकी दोघांचा कोरोना आजारामुळे मृत्यू देखील झाला. शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमाचे पालन न केल्यामुळे संबंधित लग्नाचे आयोजक तसेच हॉटेल व्यवस्थापक यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे कलम 188 प्रमाणे खटला दाखल करून कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली.