पुणे : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)च्या पोलीस हवालदाराला एका विक्रेत्याकडून तीन हजारांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अहमदनगर येथील रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली असून हवालदाराच्यावतीने पैसे स्वीकारणाऱ्या कॅन्टीन व्यवस्थापकालाही अटक करण्यात आल्याची माहिती अधिक्षक एम. आर. कडोळे यांनी दिली. मोतीलाल चुन्नीलाल बैनाडे असे अटक हवालदाराचे नाव असून रवी तोमर असे उपहारगृह व्यवस्थापकाचे नाव आहे. या संदर्भात एका पथारी व्यावसायिकाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. रेल्वे स्थानकावर व्यवसाय करू देण्यासाठी बैनाडे याने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती बैनाडे याने तीन हजार रुपयांची लाच घेण्याचे मान्य केले. सीबीआयने शनिवारी दुपारी सापळा लावला. तक्रारदार बैनाडेकडे पैसे देऊ लागल्यावर त्याने हे पैसे तोमर याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तोमर याने हे पैसे स्वीकारले. सीबीआयच्या पथकाने दोघांनाही जागेवरच रंगेहात पकडले. दोघांनाही अटक करण्यात आली असून दोघांच्याही जालना व अहमदनगरमधील घरांची झडती सुरू करण्यात आल्याचेही कडोळे यांनी सांगितले. या दोघांना रविवारी नगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आरपीएफचा लाचखोर हवालदार अटकेत
By admin | Published: March 26, 2017 2:02 AM