पुणे: लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा, क्रिमिलेयरची मर्यादा ८ लाखांवरून १२ लाख रुपये करावी, असेही ते म्हणाले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख, श्रीकांत कदम, सतीश केदारी आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, लोकसभेत आमच्या पक्षाला दोन जागा मिळणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. तरीही नाराजी दूर ठेवून आम्ही कामाला लागलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरपीआयला एक विधान परिषद मिळावी, अशी विनंती केली होती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.
आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत तिथे आम्हाला संधी मिळावी. महामंडळांच्याही नियुक्त्या कराव्यात, अशी आमची मागणी आहे. विधानसभेत महायुतीला १७० ते २०० जागा मिळतील, असेही आठवले यांनी नमूद केले. संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत मोठा गैरसमज निर्माण करून विरोधकांनी दलित आणि अल्पसंख्यांक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून मते घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही, असेही आठवले म्हणाले.
ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, माझं दोन्ही समाजांना आवाहन आहे की, भांडण न करता आपला अधिकार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा विचार करावा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.