चाकण: आरपीआय पदाधिकाऱ्याकडून होत असलेल्या छळास कंटाळून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. चाकण लगतच्या मुटकेवाडी (ता. खेड) येथे गुरुवारी (दि. ६) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संबंधित तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यास रात्री उशिरा गजाआड करण्यात आले.
प्रवीण रावसाहेब गायकवाड (वय ३६, रा. मुटकेवाडी, चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रवीण याची आई संगीता रावसाहेब गायकवाड (वय ५६, रा. लोणी बुद्रुक, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संगीता गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रदेश सचिव सचिन बापूराव वाघमारे (वय ३८, रा. पानसरे मळा, चक्रेश्वर रोड, चाकण) याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, प्रवीण हा त्याच्या कुटुंबासह चाकण लगतच्या मुटकेवाडी येथे राहत होता. यातील आरोपी सचिन वाघमारे हा प्रवीणला त्रास देऊन त्याच्या पत्नीस वेगवेगळे खोटेनाटे आमिष दाखवून संसारात अडथळा निर्माण करत होता. प्रवीण त्याला काही बोलला तर वाघमारे हा प्रवीणला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. अंगावर मारण्यासाठी धावून जात होता. माझे राजकीय नेते आणि पोलिसांशी चांगले संबंध आहेत, अशी भीती दाखवत होता. वाघमारे याच्याकडून रोजच्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून प्रवीण याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रवीण याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीमुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला. चाकण पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे पुढील तपास करीत आहेत.