पुणे : एका ग्राहकाचा बनावट ई-मेल आयडी तयार करून स्वत: खातेधारक असल्याचे भासवून खातेदाराच्या खात्यातून तब्बल १२ लाख रुपयांचे आॅनलाईन व्यवहार करून महाराष्ट्र बँकेला गंडा घातला़ हा प्रकार महाराष्ट्र बँकेच्या टिळक रोड शाखेत ५ ते ११ सप्टेंबरदरम्यान घडला होता़याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे सह महाव्यवस्थापक उमेशकुमार पराते (वय ४१, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी खोशी कुमार (वय २८, रा. दिल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बँकेच्या टिळक रोड शाखेत श्रीकृष्ण सर्जिकल नावाने खाते आहे़ आरोपीने बनावट ई-मेल आयडी तयार केला़ त्याद्वारे स्वत:च बँकेचा खातेधारक असल्याचे भासविले़ त्यानंतर बँकेला नवीन ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक दिला व तो अपडेट करण्यास सांगितले़ बँकेने त्यावर विश्वास दर्शवून त्यानुसार नवीन ई मेल आय डी व मोबाईल क्रमांक अपडेट केला़ त्यानंतर आरोपीने आॅनलाईनच्या माध्यमातून ५ ते ११ सप्टेंबर या काळात ४१ आर्थिक व्यवहार करून तब्बल ११ लाख ९९ हजार ३८८ रुपये खात्यातून काढून घेऊन बँकेची आणि खातेधारकाची फसवणूक केली़ हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेच्यावतीने पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली़ अर्जाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक के. व्ही़ इंदलकर अधिक तपास करीत आहेत़
महाराष्ट्र बँकेला १२ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:40 AM