तळेघर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर ग्रामीण रुग्णालयाच्या दुस-या टप्प्यांच्या कामासाठी १३ कोटी ५१ लाख १७ हजार रुपयांच्या आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात असणारे तळेघर हे ठिकाण भीमाशंकरकडे येणा-या भाविक-भक्तांसाठी तसेच भीमाशंकर पाटण व आहुपे खो-यातील आदिवासी लोकांसाठी तसेच खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागासाठी गरजेचे व आवश्यक असल्यामुळे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात केले. त्यानंतर या ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी ४ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर केले व ही इमारत आज बांधून पूर्ण झाली आहे. त्यानंतर टप्पा दोन मधील कामांसाठी १३ कोटी ५१ लाख १७ हजार रुपयांची आवश्यकता होती या रकमेतून उर्वरित बांधकामे डाॅक्टर व कर्मचारी निवासस्थाने, रुग्णालयाच्या इमारतीचा वरचा मजला, रेन वॉटर हर्वेस्टींग, सोलर एनर्जी पाईप लाईन, ऑक्सिजन व्यवस्था व इतर कामे होणार आहेत.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे ३० खाटांच्या क्षमतेचे ग्रामीण रुग्णालय हे राष्ट्राय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत मंजूर करण्यात आले. तळेघर हे गाव भीमाशंकर रस्त्यावर असून सतत वाहनांची वर्दळ या गावामध्ये असते. तसेच तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, व्यापार व उद्योगधंद्यांच्या केंद्रबिंदूचे हे ठिकाण आहे. येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथून तातडीच्या सुविधा पुरविणे शक्य होत नव्हते तसेच श्री क्षेत्र भीमाशंकरकडे येणा-या भाविक भक्त व पर्यटक व निसर्गप्रेमी यांना तत्पर वैद्यकीय मदत येथून देण्यावर मर्यादा येत होत्या. हे ग्रामीण रुग्णालय सुरु होताच या भागातील व परिसारातील आरोग्य विषयक प्रश्न कायमचा मिटणार आहे.