पुणे : हडपसर येथील एका तरुण डॉक्टराला वैद्यकी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी (एम. डी.) प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून दोघांनी तब्बल ३० लाख १० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सौरभ लांबतुरे (वय २६, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोषकुमार आणि शामा सर ऊर्फ बाबुभाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ लांबतुरे हे डॉक्टर असून त्यांना एम डीचे शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एका वेबसाईवर ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना फोन करुन एम. डी.ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी व संबंधिताचे बोलणे सुरु झाले. ३० जुलै ते १५ ऑक्टोंबर दरम्यान विविध फी आणि प्रोसेसिंगच्या नावाखाली संतोषकुमार आणि त्याचा साथीदार शामासर यांनी वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या खात्यात तब्बल ३० लाख १० हजार रुपये ऑनलाईन भरायला भाग पाडले. त्यानंतर त्यांचे फोन बंद झाल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.