पुणे : अनैतिक संबंधाचा त्रास होत असल्याने मयुर हांडे यांच्यावर गोळीबार करण्यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात वानवडीपोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजेश भिकू पडवळ (वय २५, रा. गोऱ्हे, ता़ हवेली) आणि बाळासाहेब अनंत जाधव (वय ५२, रा़ हांडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महंमदवाडी येथे १२ ऑक्टोबर रोजी मयुर हांडे यांच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली होती. सुदैवाने गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली. त्यामुळे ते बचावले.या घटनेचा वानवडीपोलिसांनी ४८ तासात तपास करुन गोळीबाराचा गुन्हा उघडकीस आणला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, यातील फिर्यादी मयुर हांडे यांचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ते ट्रॅक्टर घेऊन महंमदवाडी येथे गेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. राजेश पडवळ याने गोळीबार करुन हांडे यांना मारण्याची ३० लाख रुपयांची सुपारी घेतली होती. पडवळ हा इलेक्ट्रिशियन आहे़ तर बाळासाहेब जाधव हे व्यावसायिक असून हांडे याच्या वर्तनाचा जाधव यांना त्रास होत असल्यानेच त्यांनी पडवळला सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.