पुणे : हैदराबाद येथील तिघा जणांनी विश्वास संपादन करून तांदूळ खरेदी केला. त्याचे पैसे न देता प्रसिद्ध जयराज आणि कंपनीला ३८ लाख ३४ हजार ३०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हसनेन मछलीवाला, इब्राहिम मोहम्मद आणि मोहम्मद खाजा मोईनुद्दीन (सर्व रा. हैदराबाद, तेलंगणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी धवल राजेश शहा (वय ३९, रा़ आर्दशनगर, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ फेब्रुवारी २०२० ते आजपर्यंतच्या काळात घडला.
शहा यांो मार्केट यार्ड येथे जयराज आणि कंपनी हे घाऊक विक्रीचे दुकान आहे. त्यांचा तांदळाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार आहे. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ३८ लाख ३४ हजार ३०० रुपयांचा तांदूळ खरेदी केला. त्यानंतर त्याचे पैसे परत न करता विश्वासघात केला. त्यांनी वारंवार पैशाची मागणी केल्यावरही त्यांनी पैसे न दिल्याने शेवटी त्यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दाबेराव अधिक तपास करीत आहेत.