प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रस्तावित ‘पुणे-बंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’मुळे पुणे ते बंगळुरू या शहरांमधले अंतर जवळपास ९३ किलोमीटरने कमी होणार आहे. जवळपास ४० हजार कोटी रुपये खर्चून हा आठपदरी महामार्ग बांधला जाणार आहे. ताशी १२० किलोमीटर वेगाने या महामार्गावरून गाड्या धावणार आहेत; पण यासाठी पुणेकरांना आणखी खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण या प्रकल्पाचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठीच किमान तीन वर्षे लागणार आहेत. त्यानंतर जमीन हस्तांतरणाचे सोपस्कार पाडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
भारतमाला परियोजना-दोन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशात ३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करणार आहे. हे सर्व रस्ते ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ असणार आहेत. यात पुणे-बंगळुरू महामार्गाचा समावेश आहे. याचा उल्लेख नुकताच केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केला होता. सध्याचा पुणे-बंगळुरू महामार्ग हा ८३८ किलोमीटर लांबीचा आहे. ‘ग्रीनफिल्ड’ ७४५ किलोमीटर अंतराचा असणार आहे. यामुळे पुणे आणि बंगळुरू ही दोन शहरे जवळपास ९३ किलोमीटरने जवळ येणार आहेत. प्रवासाची वेळ दीड ते दोन तासांनी वाचणार आहे.
बॉक्स १
‘डीपीआर’साठी निविदा प्रक्रिया
पुणे-बंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉरच्या ‘डीपीआर’साठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. जवळपास १८ ते २० कन्सल्टन्सी यासाठी इच्छुक आहेत. दिल्लीतील येथील मुख्यालयातून या प्रकल्पावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. ७४५ किलोमीटर लांबीच्या ‘डीपीआर’साठी किमान तीन वर्षे लागण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे वर्तविली.
बॉक्स २
ग्रीनफिल्ड कॉरिडॉर म्हणजे काय?
‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ हा पूर्णत: नवा द्रूतगती महामार्ग असतो. जुन्या रस्त्याचे विस्तारीकरण यात केले जात नाही. या मार्गावरून ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतील. हे महामार्ग चार किंवा आठपदरी असतात. रस्ताच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. त्यामुळे प्रदूषण पातळी कमी राखता येते.
बॉक्स ३
म्हणून येथे वसवा दुसरे पुणे
कमी लोकसंख्येच्या गावांमधून हा महामार्ग नेला जातो. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागत नाही. परिणामी जमीन हस्तांतरण वेगाने होते. हा मार्ग बांधण्यासाठी बहुतांश वेळा माळरान, बिगरशेती जमिनींचे अधिग्रहण केले जाते. परिणामी प्रकल्प खर्च कमी होतो. विकसनशील भागातून महामार्ग जात असल्याने त्या परिसराचा विकास होण्यास मदत होते. म्हणूनच या प्रस्तावित ग्रीनफिल्डच्या आजूबाजूला नवे पुणे वसवण्याची सूचना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली.