कोविडच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील उपजिल्हा
रुग्णालय दौंड येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्रणा उभारण्यासाठी ४१ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. दौंड तालुक्यातील ऑक्सिजनचा तुटवडा व रेमिडेसिविर इंजेक्शनचा होत असलेला अपुरा पुरवठा याबाबत आमदार राहुल कुल यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. कुल यांच्या मागण्यांची दखल घेत सौरभ राव यांनी दौंड तालुक्यातील ऑक्सिजन व रेमिडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. तसेच दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होत असल्याने ग्रामीण रुग्णालय, यवत किंवा उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे कोविड -१९ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता मेडिकल ग्रेड ऑक्सिजन काॅन्सट्रेटर यंत्रणा उभारण्यात यावी, अशी विनंती कुल यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे ४१ लक्ष रुपये खर्चाची मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्रणा उभारण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. लवकरात लवकर ही यंत्रणा कार्यान्वित करून ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळेल, अशी माहिती कुल यांनी दिली आहे.