पुणे : महापालिकेच्या नवीन सुधारित क्रीडा धोरणानुसार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त २५५ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली़
शहरातील २५५ शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी ५० हजार रुपयांची ही क्रीडा शिष्यवृत्ती महापालिकेकडून देण्यात येणार असून, याकरिता १ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ तसेच या खेळाडूंचा महापालिकेच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला जाणार असून, या सोहळ्यासाठी पाच लाख सात हजार रुपयांच्या खर्चासही मंजुरी दिली आहे़
----------------------
गणेश विसर्जनासाठी २०० टन अमोनियम बायकाबोर्नेटची खरेदी
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेच्यावतीने या वर्षी मुंबईच्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सकडून २०० टन अमोनियम बायकाबोर्नेटची खरेदी करण्यात येणार आहे. पीओपीच्या गणेश मुर्ती पाण्यात विरघळत नसल्याने व त्यातील रासायनिक रंगांमुळे गणपती विसर्जनानंतर जलप्रदूषणात वाढ होत असते़ मात्र पीओपी मूर्ती अमोनियम बायकाबोर्नेटमध्ये विरघळत असल्याने प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेकडून अमोनियम बायकाबोर्नेटची खरेदी करण्यात येणार आहे़
पुणे शहरात गणेशोत्सवात सुमारे सहा लाख गणेश मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसपासून (पीओपी) बनविलेल्या असतात़ त्यातच यंदा नव्याने पालिकेत आलेली २३ गावे व वाढती मागणी लक्षात घेऊन, सुमारे ५० लाख रुपये खर्च करून २०० टन अमोनियम बायकाबोर्नेट खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचेही रासने यांनी यावेळी सांगितले.