पुणे : गेल्या काही महिन्यांपासून शहरात पेटीएम, मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांच्या बतावणीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेने वेळोवेळी केले आहे. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे काणाडोळा करून नागरिक चोरट्यांच्या जाळ्यात सापडत आहेत. अशीच एक घटना ५४ वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत घडली. सीमकार्ड अद्यायावत करण्याच्या बतावणीने चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून तीन लाख ८६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस
आला. याबाबत एकाने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कात्रजजवळील आंबेगाव परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. मोबाइल कंपनीतून बोलत असून सीमकार्ड अद्ययावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पडेल, अशी बतावणी चोरट्याने तक्रारदाराकडे केली होती. त्यानंतर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली. लिंक उघडल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने खात्यातून तीन लाख ८६ हजार ७२६ रुपये लांबविले.