पुणे - सर्वसामान्य नागरिकांना दैनंदीन जीवन जगत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळेच, अगदी घरी नळाला येणाऱ्या पाण्यापासून ते सार्वजनिक शौचालयातील असुविधेबद्दलही सातत्याने तक्रारी करण्यात येतात. मात्र, तुमच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईलच, असे होत नाही. मात्र, एका युवकाने ट्विटरवरुन केलेल्या तक्रारीची दखल थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याीतल मंचर एस.टी स्थानक (४१०५०३) येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मंचर येथील सुलभ शौचालायात महिलांना होणारा त्रास या युवकाने ट्विटरवरुन मांडला. येथील शौचालयात असलेला परप्रांतीय पुरुष कर्मचारी शौचालायात येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे शौचालाय वापरासाठी जबरदस्ती पैसे घेत असून असभ्य भाषेत बोलत आहे. सदरच्या शौचालायात महिला कर्मचारी नाही. संबंधित पुरुष कर्मचारी महिलाकडून शौचालाय वापरासाठी ७ रु. घेतो, पैसे देण्यास नकार दिल्यास महिलास असभ्य भाषेत ओरडतो. तसेच त्यांना शौचालाय वापरास मज्जाव करून त्यांचे मागे जाण्याचा प्रयत्न करतो, अशी तक्रारच तेजस पडवळ नामक ट्विटरयुजर्सने केली आहे.
तेजसने आपल्या ट्विटमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील आणि मुख्यमंत्री यांना मेन्शन केलं आहे. या युवकाच्या ट्विट तक्रारीची रुपाली चाकणकर यांनी क्वीक दखल घेतली. तसेच, या ट्विटला रिप्लाय देत, आजच दखल घेतली जाईल, असे प्रत्युत्तरही चाकणकर यांनी दिली आहे. त्यामुळे, आता संबंधित शौचालय चालकावर किंवा तेथील ठेकेदारवर काय कारवाई होणार, हे सर्वांनाच पाहायचे आहे.