पुणे : मागील तीन वर्षांत खरीप आणि रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यातील १ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. त्यासाठी २० कोटींचा विमा हप्ता भरला होता. नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना तब्बल ७८ कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, एच. डी. एफ. सी. इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, इफकोटोकिया जनरल इन्शुरन्स कंपनी, टाटा एआयजी इन्शुरन्स, भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी आणि अॅग्रीकल्चर कंपनी आदी ७ कंपन्यांनी ही नुकसानभरपाई दिली आहे.
जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार २५४ शेतकऱ्यांनी २० कोटी ३८ लाख १५ हजार रुपये पीकविमा हप्ता भरला होता. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ कोटी ५१ हजार ९०७ रुपये जमा केल्याची माहिती तंत्र अधिकारी प्रमोद सावंत यांनी दिली.
----------
* जिल्ह्यातील पीकविमा भरलेले एकूण शेतकरी :- १ लाख ४९ हजार २५४
* जिल्ह्यातील एकूण क्षेत्रावर काढलेला पीकविमा :- १ लाख १८ हजार ७८७ हेक्टर
* शेतकऱ्यांनी पिकविम्यापोटी भरलेली एकूण रक्कम :- २० कोटी ३८ लाख १५; हजार रुपये
* नुकसानभरपाई मिळालेले जिल्ह्यातील एकूण शेतकरी :- ५७ हजार ३९१
* शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली एकूण रक्कम :- ७८ कोटी ५१ हजार ९०७ रुपये