पुणे :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते संघविचारांच्या ३६ अखिल भारतीय संस्थांच्या प्रतिनिधींच्या तीन दिवसीय संयुक्त बैठकीस गुरूवारी सकाळी स.प. महाविद्यालयाच्या बंदिस्त सभागृहात सुरूवात झाली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही या बैठकीला उपस्थित होते.
संघ विचारांच्या संस्थांचे देशभरातील २६७ प्रतिनिधी या बैठकीसाठी पुण्यात आले आहेत. स. प. महाविद्यालयाच्या आवारातील एका सभागृहात सकाळी बैठकीस डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते भारतमातेचे पूष्पपूजन करून सुरूवात झाली. डॉ. भागवत यांच्यासमवेत संघाचे सरकार्यवाह डॉ. दत्तात्रय होसबाळे हेही बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. संस्कृत श्लोक पठणाने बैठक सुरू झाली.
संघाचे अनेक वरिष्ठ केंद्रीय पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरूण कुमार, मुकुंदा आणि रामदत्त चक्रधर, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, सुरेश सोनी, व्ही. भागैय्या, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का, प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीताक्का, ‘महिला समन्वय’ च्या वतीने चन्दाताई, ‘स्त्री शक्ती’च्या अध्यक्षा शैलजा, राष्ट्रीय सेवा भारतीच्या महामंत्री रेणु पाठक, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचन्द्र खराड़ी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष राजशरण शाही, भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, ‘विद्या भारती’चे अध्यक्ष रामकृष्ण राव, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकान्त चतुर्वेदी (निवृत्त), भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्मय पंड्या, ‘संस्कृत भारती’चे संघटन मंत्री दिनेश कामत यांचा उपस्थितांमध्ये समावेश आहे.
तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय व सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल असे संघाकडून कळवण्यात आले आहे. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा होईल. संघटनेचा विस्तार आणि विशेष उपक्रमांच्या माहितीची देवाणघेवाण होणार आहे. बैठकीत कोणतेही निर्णय होणार नाहीत. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या संयुक्त बैठकीतील विषयांची चर्चा होऊन त्यानंतरच संस्थांच्या कामांना दिशा देणाऱ्या धोरणांसंबधी निर्णय होतील अशी माहिती मिळाली.
स.प. महाविद्यालयाच्या आवारातच या प्रतिनिधींची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी जेवण तयार करणारे, वाढणारे हेही संघाचेच कार्यकर्ते आहेत. खासगी केटरिंगची सेवा घेण्यात आलेली नाही. बैठक होणार असलेल्या सभागृहाचा परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. माध्यम प्रतिनिधींनाही तिथे येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आवारातील संस्थेच्या दोन शाळा व एक अध्यापक महाविद्यालय यांना शिक्षण प्रसारक मंडळींकडून तीन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे.