पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाने ऑनलाईन लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आठवड्याभरात लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. तसेच प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर एसएमएस पाठविला जाणार आहेत, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी शिक्षण विभागातर्फे अर्ज मागविले होते. या जागांसाठी एकूण २ लाख २२ हजार ९४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांमधील १४ हजार ७७३ जागांसाठी ५५ हजार ८३३ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जामधून ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढून विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
पुण्यात आरटीई प्रवेशाच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे चौपट अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळणार का? याबाबत पालकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत अर्ज जमा करण्यास मुदत दिली होती. आता पालक लॉटरीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच लॉटरीद्वारे प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन प्रवेश केव्हा निश्चित करावा, याबाबतचे वेळापत्रकही अद्याप प्रसिद्ध झालेले नाही.
--
सोमवारी ऑनलाईन लॉटरी काढून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविले जाणार होते. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. परंतु, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आठवड्याभरात प्रवेश मिळालेल्या व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती पाठविली जाईल.
- दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य