पुणे : शिक्षक हक्क कायद्यानुसार (आरटीई) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संगणकीय लॉटरी काढण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या ४ एप्रिल रोजी दुपारी ४ नंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे प्रसिद्ध केली जाईल, असे प्राथमिक शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर,उपसंचालक राजेंद्र क्षीरसागर,पुणे जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड,पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत,सहायक संचालक मीना शेंडकर,गीता जोशी, वैशाली पांढरे यांच्या उपस्थितीत ही लॉटरी काढण्यात आली.
राज्यातील ९ हजार ८८ शाळांमधील १ लाख ९७७ हजार जागांसाठी २ लाख ८२ हजार ७७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील पुणे जिल्ह्यातील १५ हजार १३१ जागांसाठी ६२ हजार ९५६ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदा पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी पुण्यातच सर्वात जास्त विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहे.