पुणे : राज्य शासनाने आरटीईमध्ये सुधारणांच्या नावे केलेल्या नियम बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवडाभरानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे. या प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून, पालकांना शुक्रवारपासून (दि. १७) आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. मात्र, यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे. आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील १ लाखाहून अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आरटीईतील अन्यायकारक बदलांविरोधात पक्ष आणि संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. त्या याचिकांवर दि. ६ मे रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दि. ९ फेब्रुवारी रोजीच्या शासन अधिसूचनेला स्थगिती दिली होती. या स्थगितीस आठवडा उलटूनही आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्या नियमानुसार राबविण्यास सुरुवात झाली नाही. आरटीई प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार ते तरी सांगा? अशा मथळ्याखाली '‘लोकमत’ने बुधवारी (दि. १५) ही बातमी प्रसिद्ध केली.
या वृत्ताची दखल घेत राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांची प्रतीक्षा आता संपली आहे. आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई प्रवेशास पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची जिल्हानिहाय माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. १७) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी २५ टक्केअंतर्गत नोंदणी केली आहे. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करणे आवश्यक राहील.
- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण