पुणे : आरटीई पाेर्टलवर तब्बल दीड महिने चार ते पाच वेळा मुदतवाढ देत शाळा नाेंदणीसह रिक्त जागांची आकडेवारी अद्ययावत केल्यानंतर अखेर ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळाला आहे. आरटीई अंतर्गत रिक्त असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी पालकांना दि. १६ एप्रिल म्हणजेच आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
आरटीई पाेर्टलवर शाळांची नाेंदणी पार पडल्यानंतर आरटीई कायद्यांतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासवर्ग घटकांकरिता २५ टक्के रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास सुरूवात हाेते. मात्र, यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेला तब्बल दाेन महिने उशिराने सुरूवात झाली आहे. त्यात दीड महिना केवळ शाळांची नाेंदणी करण्यामध्ये गेला आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्यास केव्हा सुरूवात हाेणार? याची पालक मागील अनेक महिन्यापासून अतुरतेने वाट पाहत हाेते.
राज्यात ७५ हजार ९७४ शाळांनी आरटीई पाेर्टलवर नाेंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के रीक्त असलेल्या ९ लाख ७२ हजार ८२३ जागा अद्ययावत केल्या आहेत. खाजगी शाळांसह शासकीय, अनुदानित शाळांचा समावेश आहे. पालकांना दि. १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गाेसावी यांनी दिली.
पुणे जिल्ह्यांत ७८ हजार जागा
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यांतील ५ हजार १५३ शाळा नाेंदणी केली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ७७ हजार ९२७ जागा रीक्त आहेत.
ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा करावा?
नियमावली, कागदपत्रे आदींबाबबत आरटीई पाेर्टलच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.