पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाची सोडत बुधवारी काढण्यात आली. येत्या १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती कळविली जाणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश मिळूनही पडताळणी समितीशी संपर्क न साधणा-या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने लॉटरी काढली जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक व राज्याचे प्राथमिक सहसंचालक दिनकर टेमकर, राज्याचे प्राथमिक शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, आरटीई राज्य समन्वयक गीता जोशी, सुरेखा खरे,पुणे मनपा आरटीई समन्वयक वैशाली पांढरे, पुणे विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनील कुऱ्हाडे उपस्थित होते.
शिक्षण विभागाने ऑनलाईन लॉटरीची प्रक्रिया सुरू केली असून दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोणाला प्रवेश मिळणार हे पाहण्यासाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तसेच पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून पालकांनी प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
लॉटरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणास्तव पालक बाहेर गावी असतील तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॅट्स अॅप च्या माध्यमातून संपर्क साधावा. प्रवेश मिळूनही समितीशी संपर्क न साधणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. तसेच एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रतिक्षा यादीतील पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊ नये, असे दिनकर टेमकर यांनी सांगितले.
---
अभिनव स्कूलला सर्वाधिक पसंती
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नळ स्टॉप परिसरातील अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलला राज्यात सर्वाधिक पसंती मिळाली आहे. शाळेच्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या ८० जागांसाठी १ हजार ८३० तर इयत्ता पहिलीच्या जागांसाठी १ हजार ४९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी ३ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.