पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढली आहे. गुरूवारपासून (दि.१५) विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस प्राप्त होणार आहेत. परिणामी आरटीई प्रवेशाची प्रतिक्षा संपणार आहे. मात्र, पुण्यात आरटीई प्रवेशाच्या उपलब्ध जागांसाठी तब्बल चौपट अर्ज आले आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाणार का? याबाबत पालकांचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक प्रयत्नशील आहेत. राज्यातील आरटीई प्रवेशाच्या ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाखांहून २२ हजार २९ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त झाले. पुण्यात आरटीई प्रवेशाच्या १४ हजार ७७३ जागांसाठी एकूण ५५ हजार २५८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस गुरुवारी प्राप्त होणार आहे. मात्र, पालकांनी केवळ ‘एसएमएस’वर अवलंबून न राहता आरटीई वेबपोर्टलवर प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.