पुणे : शिक्षण हक्क कायद्यानूसार (आरटीई) शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठीची आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया पुढील तीन-चार दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. दि. ८ फेब्रुवारीपासून प्रवेशाची लिंक सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू आहे.. मागील महिन्यातच ही प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाल्याने प्रवेशाबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दि. २४ जानेवारीपासून आरटीईचे प्रवेश अर्ज भरण्याचे प्रक्रिया सुरू होणार होती. तत्पूर्वी सर्व संबंधित शाळांची नोंदणी करण्याचे काम सुरू होते. मात्र, राज्यातील अनेक शाळांनी नोंदणी करण्याचे टाळल्याने ही प्रक्रिया लांबली. शाळांची नोंदणी पूर्ण झाल्याखेरीज प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याने यंदाही आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडून गेले. परिणामी पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बहुतेक खासगी शाळांची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली असून काही शाळांचे प्रवेशही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आरटीई प्रक्रिया लांबल्याने पालकांच्या मनात प्रवेशाबाबत धास्ती लागून राहिली होती. अखेर शिक्षण विभागाने प्रक्रियेतून त्रुटी दूर करून दि. ८ फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आॅनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन दिवसात प्रवेशाची लिंक अहमदनगर जिल्ह्यासाठी सुरू करून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर आलेल्या त्रुटी दूर करून लगेचच संपूर्ण राज्यासाठी ही लिंक सुरू केली जाईल. दि. ८ फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज भरता यावेत, यासाठी नियोजन सुरू आहे.
आरटीईचे प्रवेश ८ फेब्रुवारीपासून; तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाल्याने निर्माण झाला होता संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 6:42 PM
शिक्षण हक्क कायद्यानूसार (आरटीई) शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठीची आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया पुढील तीन-चार दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे राज्यातील अनेक शाळांनी नोंदणी करण्याचे टाळल्याने लांबली प्रक्रियाआॅनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू : शिक्षण विभाग