पुणे : शिक्षणाचा हक्क कायदा आरटीई अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये माेफत प्रवेशासासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. पालकांना आज दुपारी बारापर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्यभरात दि. १६ मार्च अखेर रिक्त जागांच्या तिप्पट म्हणजे ३ लाख ५ हजार अर्ज प्राप्त अर्ज प्राप्त झाले हाेते.
आरटीईअंतर्गत रिक्त जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास दि. १ मार्च राेजी सुरुवात झाली. त्यानंतर पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साेळा दिवसांत राज्यभरातून तीन लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील ८ हजार ८२८ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा रिक्त आहेत.
पुण्यात ६६ हजार अर्ज
आरटीईअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९३६ शाळांमध्ये रिक्त असलेल्या १५ हजार ६५५ जागांसाठी ६६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. नाशिक ४,८५४ रिक्त जागांसाठी १८ हजार १३०, तर सातारा जिल्ह्यात १,८२१ जागांसाठी ३८२६ अर्ज आले आहेत.
लवकरच लाॅटरीची तारीख जाहीर हाेणार
ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑनलाइन साेडत लाॅटरी काढण्याकरिता तारीख निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व रिक्त जागांसाठी एकाच टप्प्यात लाॅटरी काढून शाळांमध्ये आरटीई अंतर्गत रिक्त जागांएवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. लाॅटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे.