लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि गेल्या दीड वर्षापासून फरारी असलेला रवींद्र बऱ्हाटे याची पत्नी संगीता रवींद्र बऱ्हाटे (वय ५५) हिला गुन्हे शाखेने कटात सहभागी असल्याच्या कारणावरून अटक केली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी रवींद्र बऱ्हाटे याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ बनविण्यास मदत करणाऱ्र्या पितांबर धिवार यालाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले की, हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कटात सहभागी असल्याचे तसेच रवींद्र बऱ्हाटे याच्याशी संपर्क असल्याची माहिती मिळाल्याने त्याची पत्नी संगीता यांना अटक केली. तसेच धिवार यालाही अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रवींद्र याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने आपण कशा पद्धतीने हे सर्व केले याची माहिती दिली होती.
बऱ्हाटे टोळीप्रमुख असून त्याच्यासह एकूण १३ हून अधिक लोकांवर १२ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी हडपसर, कोथरुड, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बऱ्हाटे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. बऱ्हाटे कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई महसूल विभागाने केली आहे.
बऱ्हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.
बऱ्हाटेच्या पत्नीची चौकशी
बऱ्हाटेची पत्नी संगीता यांना ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले. तेथे त्यांची अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांनी चौकशी केली़ त्यानंतर सायंकाळी त्यांना हडपसर येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.