पुणे : वाळू व अन्य बांधकाम साहित्य ट्रकमधून उघड्यापद्धतीने घेऊन जाणे बेकायदेशीर आहे. तरी शहरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे या मालाची वाहतूक केली जाते. प्रादेशिक परिवहन विभागाकडून या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली असून, दोन दिवसांमध्ये अशा ८६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या ठिकाणी वाळू, खडी तसेच बांधकामाच्या ठिकाणचा राडारोड्याची डंपरमध्ये वाहतूक केली जाते. वाहन रस्त्यावर धावत असताना पाठीमागील वाहनधारकांना त्रास होऊ शकतो, अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ते सामान उडून जाऊ नये म्हणून त्यावर ताडपत्री झाकणे बंधनकारक आहे. अशा वाहनांबाबत आरटीओकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरटीओने कारवाईला सुरूवात केली आहे. त्यासाठी आरटीओच्या चार वायुवेग पथकांकडून वेगवेगळ्या भागात कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये ८६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार आहे, असे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विना परमिटच्या ४२ बसवर कारवाई..
शहरातील अनेक शाळांमध्ये खासगी वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आरटीओने अशा खासगी बसवर देखील कारवाई सुरू केली आहे. स्कूल बसचा परवाना न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ४२ खासगी बसवर कारवाई करण्यात आली आहे. या स्कूलबसवर देखील कारवाई सुरू राहणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले.