बारामती: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवारी(दि ४) बारामती नगरपरिषदेच्या कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्यांवर कारवाई केली.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना यावेळी अधिकाऱ्यांनी दंड ठोठावला आहे. प्रदूषण परवाना नसणे, रेडियम , इंडिकेटर नसलेल्या तसेच पासिंग न झालेली वाहने कार्यालयाच्या रडारवर होती.त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली.
बुधवारी सकाळी ९ वाजता चालक आणि कर्मचारी शहरातुन कचरा संकलित करुन तो कचरा डेपोत टाकण्यासाठी पोहचल्या. यावेळी आरटीओ अधिकारी अगोदरच पोहचले होते. अधिकाऱ्यांनी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली.यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.बारामती नगर पालिका ही ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. कचरा गाड्यांसाठी वेगळा विभाग नसुन आरोग्य विभागाचे कर्मचारीच वाहनांची सर्व कामकाज पाहतात. परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई केली. यामध्ये वाहनांना १२०० रुपयांपासून ते ९५०० रुपयांपर्यंत दंड ठोठावला.त्याच्या रितसर पावत्या देण्यात आल्या आहेत.
प्रदूषण परवाना , रेडियम , इंडिकेटरसह पासिंग न झालेल्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. पालिकेकडे सध्या कचरा संकलित करण्यासाठी छोटा हत्ती २९, ट्रॅक्टर ३ , जेसीबी १ , ४०७ टेम्पो १ , ट्रॅक्टर डोजर १ एवढी वाहने आहेत.मात्र सध्या या सर्व वाहनांची देखभाल ही आरोग्य विभागाचे कर्मचारीच करतात. वाहनाचे पासिंग, इन्शुरन्स, दुरुस्तीच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. कचरा गाड्या बऱ्याच वेळा प्रमाणापेक्षा जास्त भरलेल्या असतात .त्यामुळे वाहनाचे इंडिकेटर सुरू असणे महत्वाचे आहे. अन्यथा मागून आलेल्या वाहनाला अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.त्यासाठी परिवहन विभागाच्या नियमांप्रमाणे वाहन असणे गरजेचे आहे. घंटागाडी या शहरातील गल्ली बोळात जाऊन कचरा गोळा करत असतात .नियमांचे उल्लंघन केल्यास अपघाताचा धोका आहे. कचरा टाकण्यासाठी महिला, वृद्ध, लहान मुलं येतात.या पार्श्वभुमीवर ही खबरदारी महत्वाची आहे.याबाबत मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी कारवाईबाबत पुर्ण माहिती नसल्याचे सांगितले.——————————————————————...समन्वय नसल्याचे चित्रकचरा गाडीसाठी वेगळा विभाग करून नवीन संवर्ग अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्याची गरज या कारवाईमुळे अधोरेखित झाली आहे. नवनियुक्त संवर्ग अधिकारी हे आपल्या कामाचा ताण जुन्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लादत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले .सध्या बारामती नगर पालिकेतील संवर्ग अधिकारी व जुणे अधिकारी यांच्या कामात समन्वय नसल्याचे चित्र अनेक वेळा पालिकेत पाहायला मिळत आहे.————————————बारामती पालिकेच्या वाहनांवर आज कारवाई केली आहे. वाहनांच्या कागदपत्रांची पाहणी करून पुढील कारवाई करणार असल्याचे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.