पुणे : पिंपरी आरटीओकडून पुणे आरटीओकडे गाडी ट्रान्सफर करण्यासाठी एनओसी मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. अक्षय मारुती माळवे (वय २४, रा. गंगानगर सिसोदिया मार्केटजवळ, आकुर्डी) असे या खाजगी एजंटचे नाव आहे.
तक्रारदार यांना त्यांच्या मित्राची गाडी पिंपरी चिंचवड आरटीओकडून पुणे आरटीओकडे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज केला होता. त्यांची एनओसी आरटीओ कार्यालयातून देण्यासाठी खर्च येईल, असे सांगून अक्षय माळवे याने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच मागताना तुमची फाईल ५ टेबलवरुन फिरते. त्या सर्व टेबलवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे त्याने सांगितले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार आल्यावर त्याची पडताळणी करण्यात आली. तेव्हा माळवे याने १३०० रुपये घेण्याची कबुली दिली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोशी येथील आरटीओ कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारी सापळा लावला. त्यात तक्रारदाराकडून पैसे घेताना अक्षय माळवे याला पकडण्यात आले. भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनिल बिले अधिक तपास करीत आहेत.