पिंपरी : प्रादेशिक परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी काढलेल्या दलालमुक्तीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलाल पुन्हा सक्रिय झाल्याचे शुक्रवारी दिसून आले. दलालांकडून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांची लूट केली होती. कोणत्याही कामासाठी जास्तीच्या पैशाची मागणी करून नागरिकांना त्रास देण्याचे काम होत आहे. सामान्यांची कामे वेळेत आणि व्यवस्थित होत नाही. झगडे यांनी कार्यालयाच्या आवारातून दलालांना हाकलण्याचे आदेश दिले होते. झगडे यांनी आदेशात सांगितले होते की, राज्यातील कोणत्याही कार्यालयाला स्वत: केव्हाही भेट देणार आहे. त्यामध्ये जर कार्यालयाच्या आवारात दलाल दिसून आले, तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्यानंतर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनीही दलालांची कामे न करण्याचा निर्णय घेतला होता. झगडे यांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी दलालांनी आंदोलन केले होते. मात्र, झगडे यांनी निर्णय मागे घेतला नाही. शेवटी दलालांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. त्यातच दलालांनी कार्यालयाच्या आवारात असलेली सर्व कार्यालये बंद ठेवली होती. स्टेशनरी साहित्य मिळणेही कठीण झाले होते. त्यामुळे आवारात पूर्णपणे शांतता होती. तर कार्यालयानेही मोकळा श्वास घेतला होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर दलालांनी समाधान व्यक्त करून कार्यालये पुन्हा सुरू केली. नियमितचे कामकाजही सुरु केले. (प्रतिनिधी)
आरटीओत दलाल झाले सक्रिय
By admin | Published: January 31, 2015 12:59 AM