प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: आळंदी रोड येथील आरटीओ कार्यालयात तयार केलेला रोलर ब्रेक टेस्टिंग ट्रक हा आरटीओ कार्यालयात तयार केलेला भारतातील पहिला टेस्टिंग ट्रॅक आहे. मात्र तो अतिक्रमणामुळे वापराविना आहे. हा ट्रॅक तयार करण्यासाठी जवळपास ९४ लाख रुपयांचा खर्च झाला. ट्रॅकवरून बाहेर पडण्यासाठी समोर भिंत येत आहे. भिंतीला लागून फुटपाथवर अतिक्रमण असल्याने आरटीओला भिंत पाडता येत नाही. परिणामी टेस्टिंग ट्रक हा वापराविना धूळखात पडून आहे.
रिक्षा व अन्य छोटे व्यावसायिक वाहनांना योग्यता प्रमाणपत्रासाठी दिवेघाट चढून तिथे असलेल्या ट्रकवर टेस्ट द्यावी लागते. त्यांना तिथे जावे लागू नये म्हणून आरटीओ प्रशासनाने आळंदी रोड येथील कार्यालयात २५० मीटर लांबीचा ट्रक बांधला. चाचणी पूर्ण होण्यासाठी ट्रॅकच्या पश्चिम दिशेस असलेली भिंत पाडणे आवश्यक आहे. ही भिंत पाडून तिथून ट्रॅकवरील वाहने बाहेर जाण्यासाठी रस्ता करणे प्रास्तवित आहे. मात्र भिंतीच्या दुसऱ्या बाजूस रस्त्यावरील फुटपाथवर दोन ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. आरटीओ प्रशासनाने ७ जुलै रोजी महापालिकेच्या येरवडा कळस,धानोरी क्षेत्रीय कार्यालयास हे अतिक्रमण हटविण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र कार्यवाही झालेली नाही.
----------------------
अडीच लाख वाहनधारक वेठीस :
पुणे शहरात जवळपास ८० हजार रिक्षा आहे. तर १ लाख ७० हजार वाहने ही छोटी व्यावसायिक वाहने आहेत. त्यांना योग्यता प्रमाणपत्रासाठी दिवे घाट चढून तिथल्या ट्रॅकवर जावे लागते. जर आळंदी रोडचा ट्रॅक वापरात आला, तर त्यांना दिवेघाटला जावे लागणार नाही. ह्या अतिक्रमणामुळे पुणे शहरातील जवळपास अडीच लाख वाहन धारक वेठीस आहेत.
--------------------
आळंदी रोड येथील आरटीओ कार्यालयात टेस्टिंग ट्रक तयार आहे. मात्र भिंतीच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणामुळे त्या ट्रकचा वापर होत नाही. महापालिकेने ते अतिक्रमण काढावे म्हणून पत्र दिले. त्यांच्याकडून अतिक्रमण हटल्यानंतरच ट्रॅकचा वापर होईल.
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
------------------
हा ट्रक सुरू न झाल्याने हजारो रिक्षा चालकांना फटका बसत आहे. अतिक्रमणामुळे विकासाला खीळ बसत आहे. ज्यांनी हे अतिक्रमण केले आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
-बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत.
----------------
आरटीओ प्रशासन केवळ रिक्षा चालकांवर कारवाई करीत आहे. मात्र त्यांचे प्रश्न सोडवत नाही. ट्रॅकचा वापर सुरू झाला पाहिजे.
- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत
-----------------
ट्रॅक बंद असल्याने अनेकांना सासवडला जावे लागत आहे. यात गरीब रिक्षा व टेम्पो चालक भरडला जात आहे. महापालिकेने अतिक्रमणाला अभय न देता त्यांच्यावर थेट कारवाई करावी. हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा.
- एकनाथ ढोले, अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यार्थी व मालवाहतूक संघ