पुणे : वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीमार्फत कारवाई केली जाते. त्याच्या दंडाची पावती वाहनमालकाच्या मोबाइलवर पाठविली जाते. अनेक जण वाहन विक्री केल्यानंतरही त्याची नोंद आरटीओकडे करत नाही. त्यामुळे नियम एकाने मोडला असला तरी दंडाची पावती मात्र दुसऱ्याला जाते. त्याचवेळी शहरात अनेक जण बनावट नंबरप्लेट लावून वाहन चालवित असल्याने या दंडाच्या पावत्यांवरून दिसून येत आहे.
जानेवारीत पावणेदोन लाखांना ऑनलाइन दंड
वाहतूक शाखेने जानेवारी महिन्यात सीसीटीव्हीद्वारे तब्बल १ लाख ७३ हजार ७२२ जणांना वाहतूक नियमभंग केल्याने दंड केला आहे. या वाहनचालकांना ९ कोटी १ लाख ३१ हजार ७०० रुपये दंड आकारणी करण्यात आली आहे.
महिन्याला २ हजारांवर तक्रारी
गेल्या वर्षी वाहतूक शाखेने थकबाकी असलेल्या वाहनचालकांना दंडवसुलीसाठी लोकअदालतीमध्ये या केसेस दाखल केल्या होत्या. त्यावेळी पुणे शहरातील ५० हजारांहून अधिक लोकांना या नोटीसा पाठविल्या होत्या. त्यापैकी जवळपास २ हजार ८०० जणांनी आपल्या वाहनांवर चुकून दंड आकारणी केली असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
ट्रान्सफर करणे वाहनचालकाची जबाबदारी
वाहन विक्री केल्यानंतर त्याची आरटीओकडे नोंद करणे आवश्यक आहे. अनेक जण नवीन वाहन घेताना जुने वाहन मध्यस्थाला देतात. तो इतरांना त्याची विक्री करतो; मात्र हे एजंट त्याची नोंद करतातच असे नाही. त्यामुळे जुन्या वाहनमालकावर दंडाची पावती जाते. आरटीओकडील नोंद अद्ययावत करणे ही वाहनमालकाची जबाबदारी असल्याचे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बनावट नंबरप्लेटचा सुळसुळाट
शहरात अनेक जण दंड भरायला लागू नये, म्हणून बनावट नंबरप्लेट लावून वाहन चालवित असतात. मूळच्या नंबरप्लेटमध्ये एखादा आकडा बदलतात. असे वाहनचालक बेधडक वाहन चालवित नियम मोडत असतात. त्यांना चौकातील सीसीटीव्हीने कैद केल्यावर ज्याने नियम मोडलाच नाही अशाला दंडाची पावती जाते. प्रत्यक्षात ज्या वाहनावर दंड आकारणी करण्यात आली आहे. ते आपले वाहन नाही, हे पावतीसोबत असलेल्या फोटोवरून लक्षात येते.
चुकीचा दंड असल्यास
आपल्याला चुकीचा दंड आला असल्यास मोबाइलवर महाट्रॅफिक ॲप इन्स्ट्राॅल करा. ॲपमधील ग्रिव्हेन्सेस हा पर्याय निवडा. त्यातील (अधिक) चिन्हावर क्लिक करून ग्रिव्हन्सेस करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.