पिंपरी : राज्यात २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कार्यालय बंद राहणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिली.पक्की अनुज्ञप्ती प्राप्त करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून आयडीटीआर भोसरी येथे मोटारसायकल विथ गिअर, मोटारसायकल विदाऊट गिअर, ऑटोरिक्षा तसेच पुनर्चाचणी परीक्षा व मोटार कार याची चाचणी परीक्षा घेतली जाते. यासाठी अर्जदाराला ऑनलाइन नोंदणी करावी लागते. नंतर आरटीओने ठरवून दिलेल्या तारखेला अर्जदारास नियोजित ठिकाणी उपस्थित राहून परीक्षा द्यावी लागते.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असल्याने ज्या अर्जदाराने दिनांक २० नोव्हेंबर रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतली असेल, अशा अर्जदारांनी शिकाऊ अनुज्ञप्ती अर्ज, शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती अर्जासोबत चाचणी परीक्षेकरिता दिनांक २१ नोव्हेंबर रोजी नियोजित ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.