पुणे : आरटीओतील वाहनांसदर्भातील कामकाजासाठी आवश्यक असलेल्या प्रणालीचे सर्व्हर गेल्या आठ दिवसांपासून बंद होते. त्यामुळे अनेक कामे रेंगाळली होती. मात्र, सोमवारपासून (दि. १३) सर्व्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याने मंगळवारपासून रेंगाळलेली कामे मार्गी लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बुधवारी (ता. १४) आरटीओ कार्यालयात पुन्हा कागदपत्रांच्या कामासाठी वाहनचालकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या आठवड्यात आरटीओच्या ‘सारथी’ आणि ’वाहन’ या प्रणालीचे सर्व्हर अचानक डाऊन झाले. दरम्यान सारथी प्रणालीचे काम एकदम ठप्प झाले तर वाहन ही प्रणाली अधून-मधून सुरू होती. या दोन्हींचे कामकाज एनआयसीमार्फत सुरू आहे. आता एनआयसीकडून संपूर्ण कामे पूर्ण झाली असून, सर्व्हर पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांची रखडलेली कामे आरटीओ प्रशासनाकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, रखडलेली कामे पुन्हा सुरू झाल्यामुळे दैनंदिन कामाव्यतिरिक्त आठ दिवसांच्या पेंडिंग कामाचा अतिरिक्त बोजा आरटीओ कर्मचाऱ्यांवर पडला आहे. आरटीओतील खिडक्यांवर वाहनचालकांची गर्दी झाली असून, रांगा लागल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले.