लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यात आता लग्नासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर आता उपस्थित सर्व शंभर टक्के लोकांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच ही चाचणी केली नसेल तर एका व्यक्तीमागे एक हजार रुपयांचा दंड करणार. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांत शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमानिमित्त होणारी गर्दी आणि मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळेच राज्य शासनाने रविवारी काढलेल्या आदेशात लग्न समारंभावर अधिक कडक निर्बंध घातले आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देशमुख यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे. पन्नास व्यक्तींची उपस्थिती ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर-व्हिडीओ चालक, सूत्रसंचालक यांच्यासह गृहीत धरावी, मंगल कार्यालय व्यवस्थापक/मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सिमीटर, इन्फ्रा थर्मामीटर (थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र. व स्वाक्षरी घ्याव्यात. एवढेच नाही तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसांत पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करा व मंगल कार्यालयांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश देखील देशमुख यांनी दिले आहेत.
----
हे आहेत पुणे जिल्ह्यासाठीचे नवीन नियम
- लग्न समारंभासाठी हजर राहणाऱ्या ५० जणांची नावे पोलीस ठाण्यात सादर करावीत. (ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर-व्हिडीओ चालक, सूत्रसंचालक यांच्यासह राहील) कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे.
- लग्न समारंभास उपस्थित शंभर टक्के लोकांची आरटीपीसीआर करणे.
- लग्न समारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) सहा फूट राखणे बंधनकारक राहील. लग्न समारंभाच्या ठिकाणी बसण्यासाठी व जेवण करताना सामाजिक अंतर राहील अशा पध्दतीने खुणा (मार्किंग) कराव्यात. जेवण करताना मास्क काढल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारण्यावर निर्बंध ठेवावेत.
- लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक, वाढपे, आचारी, वाजंत्री, भटजी व वऱ्हाडी मंडळी यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
- लग्न समारंभाचे ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकणे व असेही थुंकण्यास व मद्यपान करण्यास सक्त मनाई राहील आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कारवाईस पात्र राहील.
- लग्न समारंभासाठी विनावातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/खुले लॉन/सभागृह वापरण्यात यावी. कोणत्याही परिस्थीतीत वातानुकूलित सेवेचा (AC) चा वापर करण्यात येऊ नये.
- मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सिमीटर, इन्फ्रा थर्मामीटर (थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र व स्वाक्षरी घ्यावी
- लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग, खुर्च्या, लग्नाचा संपूर्ण हॉल, किचन, जेवणाचे ठिकाण, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करुन वारंवार निर्जंतुकीकरण करावे. तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करावी.
- सोशल डिस्टन्सचा वापर व अन्य नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी एक किंवा दोन प्रतिनिधी नेमावेत.
- लग्न समारंभात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सर्व नियम व अटी पालन करण्याबाबत
जनजागृती करावी.
- लग्नसोहळ्याचा सर्व विधीची पाहणी करण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, कामगार तलाठी व पोलीस
यांचे भरारी पथक कार्यरत करावे. या ठिकाणी नियमांचे उलंघन झाल्यास गुन्हे दाखल करावेत.
- लग्न समारंभाचे ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे व वरील सर्व नियम व अटींचे पालन करत
नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह तत्काळ बंद करण्यात येतील, विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसांत पोलीस ठाण्यात सादर करावी.