रुबी ते रामवाडी मेट्राे डिसेंबरमध्ये धावणार; ‘स्वारगेट मल्टिमाेडल हब’ला अजित पवारांची भेट

By राजू इनामदार | Published: October 21, 2023 05:44 PM2023-10-21T17:44:38+5:302023-10-21T17:45:43+5:30

येत्या डिसेंबरमध्ये रुबी ते रामवाडी व पुढे एप्रिलमध्ये स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा भूमिगत असे दोन्ही मार्ग सुरू होतील,’ अशी माहिती ‘महामेट्रो’ने पवार यांना या भेटीत दिली....

Ruby to Ramwadi metro to run in December; Ajit Pawar's visit to 'Swargate Multimodal Hub' | रुबी ते रामवाडी मेट्राे डिसेंबरमध्ये धावणार; ‘स्वारगेट मल्टिमाेडल हब’ला अजित पवारांची भेट

रुबी ते रामवाडी मेट्राे डिसेंबरमध्ये धावणार; ‘स्वारगेट मल्टिमाेडल हब’ला अजित पवारांची भेट

पुणे :मेट्रोचे काम बरेच मोठे आहे, त्याला विलंब होणारच. पण या मेट्रोतून सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा चांगला पर्याय पुण्यात उभा राहतोय, यातून पुणेकरांचा महत्त्वाचा वेळ वाचणार आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘वनाज ते रुबी हॉल व पिंपरी ते सिव्हिल कोर्ट मेट्रोला चांगला प्रतिसाद आहे. येत्या डिसेंबरमध्ये रुबी ते रामवाडी व पुढे एप्रिलमध्ये स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा भूमिगत असे दोन्ही मार्ग सुरू होतील,’ अशी माहिती ‘महामेट्रो’ने पवार यांना या भेटीत दिली.

पवार यांनी शनिवारी सकाळीच मेट्रोच्या स्वारगेट मल्टिमोडल हबची पाहणी केली तसेच सिव्हिल कोर्ट येथील इंटरचेंज स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक असा मेट्रोने प्रवासही केला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी त्यांना स्वारगेट स्थानक तसेच अन्य ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांची विस्ताराने माहिती दिली. यावेळी सुरू झालेल्या मार्गांबाबतही पवार यांनी विचारणा केली आणि त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे, असे मत व्यक्त केले.

रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक आणि सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या दोन्ही मार्गांच्या कामाबद्दल पवार यांनी यावेळी विचारणा केली. त्यावेळी त्यांना अनुक्रमे डिसेंबर व एप्रिलमध्ये हे मार्ग सुरू होतील, असे सांगण्यात आले. ‘स्वारगेट मल्टिमोडल हब’मध्ये ग्रॅनाईट बसविणे, वातानुकूलन यंत्रणा, फॉल सिलिंग, विद्युत, अग्निशमन, ट्रॅक्शन, युटिलिटी रूम्स, लिफ्ट एस्किलेटर ही कामे वेगाने सुरू आहेत. या कामांची पवार यांनी पाहणी केली. हर्डीकर यांनी त्यांना या जागेवरील वाहनतळ एमएसआरटीसी बसस्थानकाकडे जाणारा पादचारी भूमिगत मार्ग व व्यापारी तत्त्वावर सुरू होत असलेल्या बांधकामाची माहिती दिली.

मेट्राे स्थानकांच्या स्वच्छतेचे उपमुख्यमंत्र्यांनी केले काैतुक

यानंतर पवार यांनी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक असा मेट्रोतून प्रवास केला. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची विशिष्ट रचना ज्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, किल्ले आणि वास्तू यांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. तसेच शिवाजीनगर मेट्रो स्थानकात निवडक किल्ल्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. सिव्हिल कोर्ट आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानकांच्या स्वच्छतेविषयी पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व अशाप्रकारे भविष्यात स्वच्छता राखावी, अशा सूचना महामेट्रोला केल्या.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेचे अपर आयुक्त विकार ढाकणे, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ (कार्य), महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे (प्रशासन व जनसंपर्क), महामेट्रोचे कार्यकारी संचालक राजेश द्विवेदी आणि पोलिस उपायुक्त संदीप गिल उपस्थित होते.

Web Title: Ruby to Ramwadi metro to run in December; Ajit Pawar's visit to 'Swargate Multimodal Hub'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.