चिंचवड : येथील वाल्हेकरवाडीत हनुमान जयंतीचे औचित्य साधून बगाडाची मिरवणूक काढण्यात आली. यंदा मिलिंद वाल्हेकर यांना गळकऱ्याचा मान होता. बगाड मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नागरीकरणातही वाल्हेकरवाडीकरांनी बगाड परंपरा जपली आहे. परंपरेनुसार दर वर्षीच वाल्हेकरवाडीत हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त बगाडाची मिरवणूक काढण्यात येते. तुकोजीबुवा आणि बाळोजीबुवा या दोन घराण्यात बगाडाची मिरवणूक काढण्याचा मान दिला जातो. या वर्षी परंपरा व रितीरिवाजानुसार गळकऱ्यांचा मान मिलिंद रामदास वाल्हेकर यांना मिळाला. गेल्या तीनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. प्रथा परंपरा पुढे नेणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आमच्या वतीने दर वर्षी हा उत्सव साजरा केला जातो, असे वाल्हेकर कुटुंबीयांनी सांगितले. सकाळपासून हनुमान मंदिरात ग्रामस्थांनी पूजा अर्चा, पानफूल केले. त्यानंतर बगाडाची बांधणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी वाल्हेकरवाडीत उत्सवानिमित्त हनुमान मंदिरापासून चिंचवड येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापर्यंत बगाड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. रामदास वाल्हेकर, राजाराम वाल्हेकर, ज्ञानेश्वर वाल्हेकर, चंद्रहास वाल्हेकर, प्रकाश वाल्हेकर, प्रवीण वाल्हेकर, प्रशांत वाल्हेकर, अमोल वाल्हेकर, तुषार वाल्हेकर, शुभम वाल्हेकर, आतिश वाल्हेकर यांच्या घराला मिळालेल्या या वर्षी मान होता. (वार्ताहर)
वाल्हेकरवाडीत रंगली बगाड मिरवणूक
By admin | Published: April 25, 2016 1:13 AM