लोकमत न्यूज नेटवर्कवारजे : एका नागरिकाने पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर वारजे पोलीस ठाण्यासमोरच एकेरी वाहतुकीच्या नियमाचा भंग होत असल्याबद्दल आॅनलाइन तक्रार केल्यावर वारजे वाहतूक विभागाने संध्याकाळच्या सत्रात तत्परतेने जोरदार कारवाई करीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दंडवसुली केली.मागील काही वर्षांपासून वारज्यातील सह्याद्री शाळा चौक ते महामार्ग या कालवा रस्त्यावरील पट्ट्यात एकेरी वाहतूक असून सह्याद्री शाळेकडून पोलीस ठाणे किंवा त्यापुढे महामार्गाकडे जाण्यास बंदी आहे. तरीही येथे सर्रास नियमभंग होत असतो. काही वेळा मोठे वाहन घुसल्याने या भागात कोंडी होण्याचे चित्र सर्रास दिसते. शाळेकडून पोलीस ठाण्यापर्यंत तर पोलिसांसह नागरिकही सर्रास जाताना पाहायला मिळतात.याबद्दल एका नागरिकाने शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास पुणे पोलिसांच्या पुणे पोलीस फॉर यू पुणे सिटी पोलीस येथे तसेच पुणे सिटी पोलीस या दोन्ही ठिकाणी टिष्ट्वट करून याबद्दल फोटोसह तक्रार केली. या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर मात्र वारजे वाहतूक पोलिसांनी संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी जोरदार मोहीम उघडून कारवाई करण्यास सुरुवात केली. सह्याद्री शाळेकडून नो एंट्रीत घुसणारी वाहने मोठ्या प्रमाणावर अडवून त्यांना २०० रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले. यात मोठ्या संख्येने दुचाकीचालक व काही चारचाकी वाहनचालकही होते. शनिवारी व रविवारी या ठिकाणी सुमारे ६ हजार रुपयांची दंडवसुली झाली असल्याचे सांगण्यात येते. या भागत कोंडी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व त्याबरोबर दंडात्मक कारवाईदेखील सातत्याने झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
पोलीस ठाण्यासमोरच नियमभंग
By admin | Published: June 27, 2017 7:50 AM