वाघोली : येथील महाराष्ट्र केसरी झालेला पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत डीजे वाजविण्यात आला होता. डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मिरवणुकीमध्ये डीजे लावल्याप्रकरणी साउंड सिस्टीमचे चालक व वाघोलीतील ग्रामस्थ यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेश गायकवाड यांनी फिर्याद दिली असून मच्छिंद्र मारुती कटके, शुभम साउंड सिस्टीमचे सुरेश पवार यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या विजयी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डीजे लावण्यात आला होता.
पोलिसांच्या व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोणीही डीजे लावला, तर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे. कोणीही असले, तरी कायद्यासमोर भेदभाव केला जाणार नाही. - सर्जेराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे