पुणे : सण आणि उत्सवांसाठी उच्च न्यायालायाच्या आदेशानुसार, महापालिकेने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महापालिकेकडून गणेशोत्सवांसाठी परवानग्या देण्यात येणाऱ्या नियमांचा समावेश असून यंदाही उत्सवांमध्ये मंडळाकडून नियमांचे पालन झाल्यास पालिका तसेच पोलिसांकडून कोणत्या नियमांचा अडथळा केला जाणार नसल्याची ग्वाही महापौर दत्तात्रय धनकवडे आणि पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी शहरातील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना शुक्रवारी दिली. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मंडप टाकताना गणेश मंडळांना त्रास होईल अशा कोणत्याही नवीन अटींचा समावेश या धोरणात करण्यात आला नसल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनीही स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने उत्सवांसाठी मंडप टाकण्यासाठी धोरण तयार केले आहे. मुख्य सभेपुढे हे धोरण मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या धोरणांबाबत गणेश मंडळांची मते जाणून घेण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांची एकत्रित बैठक शुक्रवारी बोलावली होती. या बैठकीला कुमार, पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहधर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, तहसीलदार मीनल कळसकर, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, मनसेचे बाबू वागसकर, पालिका आयुक्त कुणालकुमार, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणेश मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपतीचे अध्यक्ष अशोक शेठे, रोहित टिळक, अॅड. प्रताप परदेशी यांच्यासह अनेक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपायुक्त माधव जगताप यांनी पालिकेने केलेल्या धोरणाचे सादरीकरण केले. महापालिकेने तयार केलेल्या मार्गदर्शत तत्त्वांमधील रस्त्याच्या १ चतुर्थांश भागात मंडप उभारणे, चौकात मंडप उभारण्यास मनाई, मंडळाचे प्रवेशद्वार रस्त्यास समांतर नसावे अशा काही अटी प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यास मंडळाच्या प्रतिनिधींनी विरोध केला. तसेच पुण्यातील रस्ते अरुंद असल्याने हे नियम पुण्यासाठी वेगळे असावेत, अशी मागणी केली. या वेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या मार्गदर्शक तत्त्वांमधील तरतुदी या महापालिकेकडून दरवर्षी घालून दिलेले नियमच असून त्यात कोणतेही बदल न करता ते एकत्रित धोरण म्हणून ठेवण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. मुख्य सभेतही या तत्त्वांना मान्यता देताना, मंडळांना जाचक नियम ठेवत नसल्याचे आश्वासन धनकवडे यांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी)
नियमांचा अडथळा येऊ देणार नाही
By admin | Published: July 25, 2015 4:19 AM