पुणे : शहरात दररोज ६ ते ७ हजार काेराेनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. काॅन्टॅक्ट ट्रेसिंगची यंत्रणा पूर्णपणे काेलमडली आहे. यामुळे काेराेनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. स्वॅब तपासणीचे रिपोर्ट येण्यास चार ते पाच दिवस लागत आहेत. एकूणच कोरोना परिस्थिती हाताळण्यात सत्ताधारी भाजपा आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे.
काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचे नियोजन कोलमडले असून खासगी रुग्णालयांना लस देण्यासाठी पालिकेचे अधिकारी पैसे मागत आहेत. गृह विलगीकरणात राहून बरे होऊ शकणारे रुग्णही खासगी रुग्णालयांमध्ये पैसे भरून रुग्णालयात दाखल हाेत आहेत. शहराच्या बाहेरील रुग्ण शहरातील रुग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर पालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही.
खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश काढले असले तरी त्यावर पालिकेचे नियंत्रण नाही. त्यामुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. बेडस उपलब्ध करण्यासाठी असलेल्या वॉर रुममधील नंबर लागत नाहीत. डॅशबाेर्डवर जागा रिक्त दिसतात, परंतू प्रत्यक्षात रुग्णालयात जागा मिळत नाही. रेमडेसिविर इंजेक्शनाचा तुटवडा भासत असून पालिकेने तयारी करणे अपेक्षित हाेते. पालिका प्रशासन माेठमाेठया रकमेच्या निविदा काढण्यात मग्न असून शहरात रूग्ण रस्त्यावर मृत्युमुखी पडतील अशी परिस्थिती तयार हाेणार आहे.
सत्ताधारी पक्ष देखील माेठया निविदा प्रक्रिया काढणेसाठी खातेप्रमुखांवर दबाव आणत आहेत. आयुक्तांकडे काेराेना विषयी सर्व पक्षीय नेत्यांची आढावा बैठक घेण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या.