पुणे शहरातील खासगी रुग्णालयातल्या लुटीवरून महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:41 PM2020-08-18T16:41:47+5:302020-08-18T16:49:52+5:30
मनसेच्या नगरसेवकांनी ओतली महापौरांसमोर औषधे
पुणे : खासगी रुग्णालये आणि या रुग्णालयातील मेडिकल दुकानांकडून रूग्णांची लूट सुरू असून याविषयी प्रशासन नुसत्याच नोटिसा बजावत आहे. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या मुख्यसभेमध्ये गदारोळ झाला. यावेळी कोरोनाविषयक केलेल्या कामांवरून राज्य शासनाने उशीर केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी मेडिकल्सवर कारवाई करावी असे फलक हाती धरत महापौरांच्या आसनासमोर उभे राहून खासगी रुग्णालयांमधील मेडिकल्सवर कारवाईची मागणी केली. अनेक दिवस कारवाईची मागणी करीत असतानाही प्रशासन कारवाई करीत नाही. सर्व खासगी रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी व पुरावे आहेत. रुग्णांच्या नातरवाईकांना वाढीव औषधे खरेदी करायला लावली जात आहेत. नागरिकांकडून हजारो रुपयांची बिले वसूल केली जात असल्याचे मोरे म्हणाले.
हाच धागा पकडत काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी मागील तीन मुख्य सभांमध्ये हा विषय मांडूनही त्याविषयी गांभीर्याने कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. रुग्णालयात ४० हजारांच्या इंजेक्शनची मागणी केली जात आहे.
कोविडची औषधे काळ्या बाजारात विकली जात आहेत. या विषयावर चर्चा घडविण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील परिस्थिती नियंत्रणात नाही. पुणेकरांना त्रास होत आहे. कम्युनिटी स्प्रेड झालाय हे प्रशासन का मान्य करीत नाही असा प्रश्न उपस्थित करीत जम्बो कोविड सेंटर तीन महिन्यांपूर्वीच का उभारले नाही यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
त्यावर आक्रमक झालेल्या सभागृह नेते धीरज घाटे यांनी आम्ही नाही राज्य सरकारने उशीर केला आहे. पालिका आपले काम करीत आहे असे उत्तर दिले. या उत्तरावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरत स्वतःचे अपयश राज्य शासनावर खपवू नका असे सुनावले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक सुभाष जगताप, प्रशांत जगताप, विशाल तांबे, अरविंद शिंदे आदी नगरसेवक आक्रमक होत महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. 'चार महिने तुम्ही काय केले, ३०० कोटी कशावर खर्च केले हे सांगा असा सवाल विरोधी पक्षांनी केला. एकंदरीतच या विषयावर मुख्यसभेत गदारोळ झाला.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासन आणि पालिका या विषयावर बोलू नये तसेच केवळ पुणे आणि कोरोना या विषयावर बोलूया, वसंत मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलूया, तीन सभांमध्ये हा विषय सुरू आहे. सर्वांची भावना सारखीच असल्याचे सांगत प्रशासनाला चौकशीचे निर्देश दिले.
----///----
खासगी रुग्णालये आणि मेडिकल्सकडून देण्यात येणाऱ्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. या प्रकरणांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. तक्रारींमधील सत्य पडताळण्यासोबतच राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन होते की नाही हे तपासण्याचे सक्त निर्देश मोहोळ यांनी प्रशासला दिले