पुणे : पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत प्रमुख रस्त्यांवरून वाजतगाजत अन् जल्लोषात गणरायाला निरोप दिला जातो. तब्बल १३१ वर्षे ही मिरवणुकीची परंपरा अखंडितपणे सुरु आहे. केळकर, लक्ष्मी, कुमठेकर आणि टिळक या चार रस्त्यांवरील मिरवणुकांची सांगता अलका टॉकीज चौकात होते. पुढ़े सर्व मंडळे संभाजी पुलावरून मार्गस्थ होतात. पण मेट्रो प्रकल्पाअंतर्गत डीपीआरमध्ये मेट्रोचा पूल संभाजी पुलावरून जाणार असल्याचे निश्चित झाले. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला. मात्र पुण्यातील गणेश मंडळांनी यावर आक्षेप घेतला होता. आता यावरून पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अखेर पुणे शहरातील काही प्रमुख मंडळांनी मेट्रो संभाजी पुलावरुन जाण्यास पूर्णपणे पाठिंबा दिल्याचे पत्रक काढले आहे.
डीपीआर चुकवण्याचा महापालिकेतील सत्ताधारी पक्ष कारणीभूत
पुणे मेट्रोचे काम थांबवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाही़ परंतु, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनीच पुणे मेट्रोचा डीपीआर चुकवला आहे. त्यामुळेच १३१ वर्षांची परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची वैभवशाली परंपरा खंडित होणार आहे. याला तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. सप्टेंबर महिन्यात कोणत्या अधिकारात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संभाजी पुलावरील मेट्रो पुलाचे कामकाज थांबविले याचे उत्तरही द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महापालिकेत मेट्रो कामावरून नुसताच गोंधळ
या विषयावर पुणे महापालिकेच्या सभागृहात विस्तृतपणे चर्चा करून माध्यमांच्याद्वारे पुणेकरांना सत्य परिस्थिती समजावी अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती़ मात्र, पुणेकरांसमोर आपलं पितळ उघडं पडेल या भीतीने महापौरांनी सदस्यांना भाषण करण्याची परवानगी नाकारली. महापौरांनी अशी अहंकारी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षाच्या सदस्यांनी महापौरांसमोरच ठिय्या मांडला. जवळपास तासभर चाललेल्या या गोंधळात मेट्रोचे कामकाज थांबवा अशी मागणी कोणीही केली नाही. पुणे शहराच्या विकासाला, पुणे मेट्रोच्या कामाला आमचा पाठिंबा आहे. मात्र पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा गाडून त्यावर विकासकामांचे इमले बांधण्याचा भाजपचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही़
शहरातील प्रमुख मंडळांचा पूर्णपणे पाठिंबा
गेल्या ४ वर्षांपासून मेट्रोचे पुण्यात काम सुरू आहे. एक मेट्रोची मार्गिका गणपती विसर्जन मार्गावरून जात आहे. संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाच्या उंचीमुळे गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूक रथास अडथळा निर्माण होईल म्हणून महापौर यांना काम बंद करणेबाबत निवेदन देण्यात आले. तेव्हा महापौर यांनी मेट्रोचे संबंधित अधिकारी व गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते यांच्याशी बैठक घेऊन, त्याबाबत काही मार्ग निघतोय का यासाठी जवळपास चार महिने प्रयत्न केले; पण तज्ज्ञ समितीकडून व्यवहार्य मार्ग न निघाल्याने महापौर यांनी काम सुरू करण्यास सांगितले आहे. आम्ही सगळे गणपती मंडळ कार्यकर्ते असलो तरी जबाबदार पुणेकर नागरिक आहोत. १२५ वर्षांहून अधिक पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असून, आम्ही समाज प्रबोधन, समाजहिताला प्राधान्य दिले आहे. संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंचीबाबत आमचा कधीही विरोध नव्हता, असेही त्यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.