पुणे : स्थानिक नागरिकांच्या मागणीतून एका रात्रीत तयार होणाऱ्या रस्त्यांवरील रम्बलर्सची वाढती संख्या त्या रस्त्यांवरून रोज जाणा-येणाऱ्या वाहनचालकांच्या त्रासाचे कारण होत आहे. रम्बलर्स काढून टाकण्याची त्यांची मागणी, ते राहू द्यावेत यासाठी आग्रही असलेले स्थानिक नागरिक व त्यांच्या मागे असलेले माननीय यातून करायचे काय, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.दत्तवाडी परिसरातील गतिरोधकांच्या (सिमेंटचे तसेच नव्याने निघालेले प्लॅस्टिकचे) तसेच रम्बलर्स (रस्त्यापेक्षा अगदी थोड्या उंचीवर असणाऱ्या रंगांच्या सलग ५ ते ७ पट्ट्या) संख्येबद्दल सातत्याने तक्रार करण्यात येते. या वाढत्या संख्येतील त्या भागातील घरांची रचना कारणीभूत आहे. रस्त्याला अगदी लागून घरे आहेत. लहान मुले, वृद्ध व्यक्ती घरातून बाहेर सातत्याने येत जात असतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांची त्यांना धडक बसू शकते. असे होऊ नये, वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी या भागातील नागरिकांकडून रम्बलर्स किंवा गतिरोधक बसवण्याची मागणी केली जाते. नगरसेवकांकडे झालेली ही मागणी मतदारांची असल्यामुळे त्वरित पूर्ण केली जाते. त्यामुळे या रस्त्यावर अगदी ५० फूट अंतरावरसुद्धा असे गतिरोधक किंवा रम्बलर्स बसवले गेले आहेत. ती त्या त्या भागाची गरज आहे, ती लक्षात घेऊनच महापालिका किंवा वाहतूक शाखेकडून बसवले जातात. त्यांची संख्या आता वाढल्यामुळे वाहनचालकांना त्या रस्त्यावरून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यातही दुचाकी वाहने तर खडखड करत पुढे जातात. त्यातून अनेकांना पाठीचे, मानेचे, कंबरेचे विकार जडले आहेत. रम्बलर्स रस्त्यावर लगेच दिसत नाहीत. त्यामुळे वाहनाचा वेग कमी झाला नसेल तर हा त्रास अधिकच वाढतो. कमी केला तर गाडीचे शॉक अॅब्झॉर्बर खराब होतात. अनेकांची वाहने नादुरुस्त होत आहेत.त्यामुळे वाहनचालकांकडून गतिरोधक काढून टाकावेत अशी मागणी सातत्याने होत असते. ते ऐकून महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी गेले की स्थानिक नागरिकांकडून त्यांना विरोध केला जातो. नगरसेवकांकडे तक्रार केली जाते. माननीय लगेच तिथे हजर होतात व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. अशा प्रकारांची संख्या वाढू लागल्यामुळे महापालिकेच्या पथ विभागातील अभियंते, वरिष्ठ अधिकारीही आता वैतागून गेले आहेत. त्यातूनच याविषयाचा विचार करण्यासाठी लवकरच वाहतूक शाखा, काही नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्या बैठकीचा विचार आहे. शहरांतर्गत असलेल्या रस्त्यांवर बहुसंख्य ठिकाणी अशीच स्थिती आहे. गेल्या काही वर्षांत तर नगरसेवक गतिरोधक, रम्बलर्स किंवा स्टिल पोलॉर्ड याकडे आपल्या प्रभाग विकास निधीतील खर्चाचा एक अत्यावश्यक भाग म्हणूनच पाहत आहेत. त्यामुळेच शहरातील बहुतेक रस्त्यांवर ते बसवले गेले आहेत. काही ठिकाणी तर रस्ता कमी व गतिरोधक जास्त अशी स्थिती झाली आहे. शहरातंर्गत रस्त्यांची अवस्था आधीच नाजूक असते. ते ठिकठिकाणी खोदून ठेवलेले असतात. त्यात आता गतिरोधकांची भर पडली आहे. त्यामुळे हे रस्ते म्हणजे अडथळ्यांची शर्यत झाले आहेत.कोणत्या रस्त्यावर किती गतिरोधक, रम्बलर्स असावेत, दोन गतिरोधकांमधील अंतर किती असावे याबाबत महापालिकेत काही धोरणच नाही. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे प्रकार, पादचाऱ्यांचा वापर असा बारकाईने विचार होण्याची यात गरज आहे, पण महापालिकेच्या ते गावीही नाही. इतकेच काय, पण वाहतूक शाखा व महापालिका यांच्यातच याबाबत कसला समन्वय नाही.स्थानिक नागरिक व त्या रस्त्याचा वापर करणारे वाहनचालक अशा दोन्ही बाजूंनी याबाबत तक्रारी येत आहेत हे खरे आहे. त्यामुळेच याबाबत आता विचार करावा लागणार आहे. सर्व घटकांशी संपर्क साधून यावर उपाययोजना केली जाईल.- राजेंद्र राऊत, मुख्य अभियंता, पथविभाग, महापालिका
रम्बलर्सने वाढतेय धडधड
By admin | Published: April 10, 2017 2:54 AM