लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या निकालाची प्रक्रिया सुरू असून, अद्याप राज्य मंडळाने निकालाची अधिकृत तारीख प्रसिध्द करण्यात आली नाही. त्यामुळे निकालाबाबत पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेऊ नये,असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे.
बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केले आहेत. आता विभागीय मंडळाकडून प्राप्त गुणांचे संकलन राज्य मंडळकडून केले जात आहे. मंडळाकडून ३१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी विद्यार्थी व पालकांना अपेक्षा होती. परंतु, निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात बारावीचा निकाल येत्या ७ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल,अशी अफवा विद्यार्थी व पालकांमध्ये परसली आहे. परंतु,या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
------------------
राज्य मंडळातर्फे बारावीचा निकाल तयार करण्याचे काम केले जात आहे. राज्य मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
- दिनकर पाटील,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ