यवत : मुंढवा जॅकवेलचा पाणीशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी निश्चितपणे उपाययोजना केल्या जातील. १०० एमएलडीपेक्षा जास्त दूषित पाणी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाते, यासाठीदेखील उपाययोजना करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिले.आमदार राहुल कुल व बाबूराव पाचर्णे यांनी उपस्थित केलेल्या प्रशांना उत्तर देताना ते बोलत होते.मुंढवा जॅकवेलचा पाणीशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, ५ टीएमसीपेक्षा जास्त वापरलेले पाणी शेतीसाठी पुन्हा द्या व जुन्या मुठा उजवा कालव्याचे (बेबी कॅनॉल) अस्तरीकरण लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी कुल यांनी विधानसभेत केली. विधानसभा नियम ९४ अन्वये त्यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते.मुंढवा जॅकवेलची योजना आॅक्टोबर २०१५पासून कार्यान्वित करण्यात आली असली, तरीही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. करारनाम्यातील अटीनुसार ११.५० टीएमसी पाणीपुरवठा करताना ६.५० टीएमसी एवढे प्रक्रिया केलेले सांडपाणी सिंचनासाठी मुठा उजवा कालव्यामध्ये उपलब्ध करून देण्यास विलंब केला जात आहे. मैलापाणी आणि मैला दोन्ही नदीमध्ये सोडण्यात येते. याव्यतिरिक्त मुळा-मुठा नदीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावांतील १०० एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया न होता नदीत मिसळले जात आहे. त्यामुळे लाभार्थी क्षेत्रामध्ये आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जमिनीचा पोतदेखील खराब होत आहे. याअनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता. पाच टीएमसीपेक्षा जास्त वापरलेले पाणी पूर्णपणे शुद्धीकरण करून मूळ प्रकल्पाला परत देण्याचे बंधन शासन महापालिकेला घालणार का? जुन्या मुठा कॅनॉल (बेबी कॅनॉल) अस्तरीकरणाचे नियोजन शासन कधीपर्यंत करणार? त्याचे अंदाजपत्रक तयार कधीपर्यंत होणार? मुळशी धरणाला लावेलेला अविनाशी कराराचा नियम खडकवासला प्रकल्पाला लावणार का? पाणी पूर्ण क्षमतेने कालव्याच्या टेलला (पुच्छ भाग) पोहोचण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार? आदी मागण्या सभागृहात केल्या. (वार्ताहर)
प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवू!
By admin | Published: March 25, 2017 3:24 AM