पुणे- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं मंगळवारी सकाळी आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी व नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पुण्याती खंडूजी बाबा चौक ते स.प. महाविद्यालय पर्यंत ही एकदा दौड होती. पूर्ण भारतात एकतेचा संदेश पोहोचवण्याचा या रॅली चा उद्देश आहे. या एकता दौड रॅलीमध्ये जागतिक स्पर्धेचे विजेते, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट पुरस्कार विजेते, ध्यानचंद पुरस्कार विजेते असे खेळाडू सहभागी झाले होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये शाळेतले अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, भाजपचे योगेश गोगावले, नगरसेवक हेमंत रासने, स.प महाविद्यालय प्राचार्य दिलीप शेठ, क्रीडा पटू रेखा भिडे, सिम्बॉयोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. श.बा. मुजुमदार, कर्नल गोखले, जनरल दत्तात्रय शेकटकर, डॉ. के. एच संचेती, बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात 1 हजार एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात पुण्यातील या कार्यक्रमाचा समावेश आहे. याकार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वाना शुभेच्छा. 2017- 2022 या कालावधीत होणाऱ्या नवभारत निर्मितीत सर्वांनी सहभागी व्हावं, असं पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हंटलं.