पुणे: भारतीय संविधान दिन अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (दि. २६) संविधान सन्मान दौड आयोजित केली आहे. यात पुणे शहरासह राज्य, देश आणि परदेशातील ५० ॲथलेटिक्स सहभागी होत आहेत, अशी माहिती संविधान दौडचे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी दिली. दौडच्या जर्सीचे अनावरणही या वेळी करण्यात आले.
या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, बार्टीच्या अधीक्षक डॉ. संध्या नारखेडे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने आयाेजन केले आहे.
वाडेकर म्हणाले की, संविधान दौडची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातून होईल. याचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान होणार आहे.
स्पर्धेत धावू शकणार नाहीत, अशा महिलांसाठी खास ‘वॉक फॉर संविधान’चे आयोजन केले आहे. सकाळी ८ वाजता विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे वॉक सुरू होईल, असेही वाडेकर यांनी सांगितले.